बीड,
मराठवाड्यातील महामंडळाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन, अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या विशेष सहकार्यातून कार्यान्वित होणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाडा विभागाच्या “उपविभागीय कार्यालयाचे उद्धघाटन” रविवार, २७ जुलै, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे होत आहे.
या कार्यालयाच्या उद्धघाटन समारंभाच्या निमित्ताने बीड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा मराठवाड्यात प्रचार, प्रसारासाठी व्याप्ती वाढवणे. मराठवाड्यातील जिल्ह्यातील लाभार्थ्यांची महामंडळाच्या निगडीत कामाकरीता ई-सेवा केंद्र, CSC सेंटर, खासगी ऑनलाईन सेंटर अथवा एजंटकडून होणारी फसवणूक टाळणे. मराठवाड्यातील मराठा समाजापर्यंत पोहोचून त्यांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त लाभार्थी उद्योजक घडविणे.
यासाठी बँकेत प्रलंबित कर्ज प्रकरण संदर्भातील तक्रार निरसन करून व्याज परतावा त्रुटींबाबत मार्गदर्शन करून Claim Hold, Sanction Hold विषयी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून समस्या निवारण करणे असे या उप विभागीय कार्यालयाच्या उद्धघाटना मागील उद्दिष्टे आहेत.
मराठवाडा विभागातील हे कार्यालय सुसज्ज आणि अद्ययावत असणार आहे. पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध असतील. या उपविभागीय कार्यालयामुळे मराठवाड्यातील लाभार्थी यांचा वेळ वाचेल.
अधिकाधिक लाभार्थी यांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देण्यासही लाभार्थी व महामंडळ यांना सोयीचे होईल. तालुकास्तरावर देखील महामंडळाच्या योजना पोहोचविण्यासाठी आगामी काळात दौरे करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
अण्णासाहेव पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी उप विभागीय कार्यालय राजू कॉम्प्लेक्स,२रा मजला, हिना हॉटेल समोर, जालना रोड, बीड येथे सुरु करण्यात येत आहे. या निमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामंडळाच्या “उप विभागीय कार्यालय उद्घाटन समारंभास” जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व मेळाव्यात सहभागी होऊन महामंडळाच्या योजनेची माहिती घ्यावी. याबरोबरच लाभार्थ्यांनी स्वतःची समस्या निवारण करून घ्यावे, असे आवाहन श्री. आगवण पाटील यांनी केले.