बीड
श्री. देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री आणि श्री. अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, बीड यांच्या हस्ते अमलनेर(भां) – बीड नवीन रेल्वेमार्गीकेचे उद्घाटन व बीड ते अहिल्यानगर पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार असून, दिनांक १७.०९.२०२५ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि श्री. अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, बीड यांच्या हस्ते अंमळनेर(भां) – बीड नवीन रेल्वेमार्गीकेचे उद्घाटन तसेच बीड ते अहिल्यानगर या शुभारंभ गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सौ. पंकजा मुंडे, मा. मंत्री पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, हा कार्यक्रम दिनांक १७.०९.२०२५ रोजी बीड रेल्वे स्थानकावर पार पडणार आहे.
हा कार्यक्रम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासोबत साजरा होणार आहे. हा दिवस १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या निजामावर भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाची आठवण करून देतो. या विजयामुळेच मराठवाड्याचा भारतीय संघराज्यात समावेश झाला होता.
पार्श्वभूमी:
•६७.७८ कि.मी. लांबीचा आमलनेर(भां) – बीड नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग ही २६१.२५ कि.मी. लांबीच्या अहिल्यानगर – बीड – परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गीका प्रकल्पाचा एक भाग आहे.
•अहिल्यानगर – अंमळनेर(भां) या ९९.०३ कि.मी. लांबीच्या विभागाचे उद्घाटन आधीच झाले असून या विभागावर नियमित गाड्यांची सेवा सुरू आहे.
•६७.७८ कि.मी. लांबीच्या अंमळनेर (भां) – बीड या नवीन रेल्वेमार्गीकेच्या उद्घाटनाचे काम अतिशय आव्हानात्मक ठरले. या विभागात १५ मोठे पूल, ९० लहान पूल, १५ रोड ओव्हर ब्रिज, ३१ रोड अंडर ब्रिज तसेच ५ स्थानकांचे बांधकाम करण्यात आले आहे.
•या प्रकल्पाचा खर्च भारतीय रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये ५०:५० टक्के वाटा या तत्त्वावर करण्यात येत आहे.
फायदे:
•या विभागावर रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे मराठवाडा प्रदेशातील आतापर्यंत रेल्वेसेवेपासून वंचित राहिलेल्या भागांना तसेच दुर्गम भागांना रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.
•यामुळे मराठवाडा प्रदेशाचा महाराष्ट्राच्या इतर भागांशी संपर्क साधला जाईल आणि विकासाच्या अमर्याद संधी निर्माण होतील.
•यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशातील पारंपरिक दुष्काळग्रस्त भागांचा सामाजिक-आर्थिक आणि औद्योगिक विकास साधण्यातही मदत होईल.
•बीड ते अहिल्यानगर या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आल्याने (सध्या अंमळनेर {भां} ते अहिल्यानगर या दरम्यान असलेल्या) या विभागावर रेल्वे सेवांची सुरुवात होणार आहे.
•यामुळे या विभागातील बीड, राजुरी(नवगण), रायमोहा, विघनवाडी, जाटनांदूर आणि अंमळनेर(भां) या स्थानकांशी संपर्क सुधारेल आणि त्या भागांचा विकास साधला जाईल.
•या विस्तारित गाडी सेवा विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि दैनंदिन प्रवाशांना परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात मदत करेल.
अहिल्यानगर आणि बीड हे दोन्ही जिल्हे वेगाने विकसित होत आहेत. येथे फक्त कृषी उत्पादनांपुरतेच मर्यादित न राहता अनेक लहान व मध्यम उद्योगही आहेत. तसेच, हे जिल्हे त्यांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक प्रसिद्धीसाठीही ओळखले जातात.
अहिल्यानगर जिल्हा त्याच्या कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि शनी शिंगणापूर मंदिर ही प्रमुख तीर्थस्थळे असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय भंडारदरा धरण, कळसुबाई शिखर, रंधा धबधबा, रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि इतर पर्यटनस्थळे ही येथे महत्त्वाची आकर्षणे आहेत.
महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील बीड जिल्ह्याला समृद्ध इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी येथील प्रसिद्ध वैजनाथ ज्योतिर्लिंग हे येथे असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय या जिल्ह्यात इतर धार्मिक महत्त्वाची ठिकाणेही आहेत.
अहिल्यानगर -बीड विभागाचे उद्घाटन, हे अहिल्यानगर – बीड – परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गीका प्रकल्पाचे एक महत्वाचे पायरी ठरले आहे, ज्यामध्ये अनेक भौगोलिक आणि लॉजिस्टिक अडचणींवर मात केली गेली, आणि हे मध्य रेल्वेसाठी एक महत्वाची उपलब्धी ठरले आहे.
मध्य रेल्वे रेल्वेचे जाळे विस्तारित करण्यास आणि समावेशक विकास व प्रादेशिक उन्नतीसाठी अंतिम टप्प्यापर्यंतचा संपर्क सुधारण्यास कटिबद्ध राहील.