बीड शहरातील धानोरा रोड परिसरातील एका राहत्या घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) ने मंगळवारी (19 नोव्हेंबर 2025) छापा टाकत एक पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या 70 वर्षांच्या महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
PSI पल्लवी जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे AHTU पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई केली. धानोरा रोड परिसरातील एका घरामध्ये बाहेरील महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला.
डमी ग्राहकाकडून पैसे घेताच छापा
डमी ग्राहकाला वेश्या गमनासाठी 1000 रुपये मागण्यात आले. ठरलेली रक्कम दिल्यानंतर डमी ग्राहकाने इशारा केल्यावर AHTU पथकाने तत्काळ छापा टाकला. छाप्यामध्ये सीताबाई नारायण दहे (वय 70, रा. धानोरा रोड, बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत डमी ग्राहकाने दिलेल्या दोन 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.
एक पीडितेची सुटका
सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली. तिने चौकशीत सांगितले की आरोपी महिला सीताबाई दहे या बाहेरील महिलांना बोलावून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या. खोलीच्या तपासात 24 वापरात नसलेले निरोधही सापडले.
गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा, 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची आवश्यक ती मदत पुरविण्यात आली.
पोलिसांची संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत PI उमाशंकर कस्तुरे, PSI पल्लवी जाधव, तसेच महिला पोलिस कर्मचारी उषा चौरे, हेमा वाघमारे, हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे आणि पोलिस शिपाई योगेश निर्धार सहभागी होते.
