पाटोदा,
beed pankaja munde saint wamanbhau मी पालकमंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गहिनीनाथगडाच्या विकासासाठी निधी आणून विकास कामांना सुरुवात केली होती. एक लेक म्हणून अधिकाधिक भव्य दिव्य अशा गडाच्या विकासाची मनोमन इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधात साखर टाकली असून आज जो गहिनीनाथ गडाचा विकास सुरू आहे तो एकमेव देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच शक्य झाला आहे.
त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर लोकांचे हे प्रेम, आशीर्वाद आणि डोळ्यातील आदर कायम राहण्याजोगे काम आपल्या हातून घडावे हीच संत वामनभाऊ चरणी आपण प्रार्थना करत असल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गहिनीनाथगडावर बोलताना व्यक्त केली.
संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यासाठी गहिनीनाथगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी मंत्री आ धनंजय मुंडे उपस्थित होते. प्रारंभी गहिनीनाथगडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांनी मुख्यमंत्री व पंकजाताई मुंडे यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.
संत वामनभाऊ महाराज व संत भगवानबाबा हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असून डोंगरदऱ्यांमध्ये, कडी -कपारींमध्ये राहणारा हा समाज ज्यांनी सुसंस्कारित केला अशा या संतांचे संस्कार देशाच्या कानाकोपऱ्यात आजही आपल्याला दिसतात. ज्या काळामध्ये माणूस माणसासारखा वागत नव्हता, त्या काळात त्यांना संस्कार देऊन सन्मार्गाला लावण्याचे काम संत भगवानबाबा आणि संत वामनभाऊ यांनी केले आहे. संत वामनभाऊ यांना वाचासिद्धी होती असे म्हणतात. आजही या संतांचे विचार हे आपल्यासाठी दीपस्तंभ असून त्यांच्या विचारावर आपली नितांत श्रद्धा आहे. त्याच आशीर्वादाने आणि श्रद्धेने आपण वाटचाल करत असल्याची ग्वाही ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिली.
लेकीच्या पदरात मुख्यमंत्र्यांनी साखर टाकली!
गहिनीनाथगडाचा विकास आणि गहिनीनाथगडाची लेक म्हणून असलेल्या नात्याचा संदर्भाने बोलतांना ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आपल्या वडिलांना गोड धोड खाऊ घालायची इच्छा असते, त्यासाठी ती मूठभर गहू, मूठभर तांदूळ आपल्या पदरात घेऊन येते त्यात साखरेची कमी असते. ती साखर टाकण्याचे काम एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे मी पालकमंत्री असताना गडाच्या भव्य विकासाचा घेतलेला ध्यास व माझी इच्छा पूर्णत्वास येत आहे. गहिनीनाथ गडाचा आज भव्य दिव्य विकास सुरू असून हे एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच शक्य झाल्याचे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
