Thursday, March 5, 2026

बीड कॉपीमुक्त परीक्षा: दहावी–बारावीच्या परीक्षांवर सीसीटीव्ही व ड्रोनची कडक नजर; गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

बीड

बीड कॉपीमुक्त परीक्षा : बीड जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा कॉपीमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनच्या माध्यमातून सतत निगराणी ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर तसेच गैरप्रकारांना मदत करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 45 हजार 247 विद्यार्थी बसणार असून दहावीच्या परीक्षेसाठी 43 हजार 68 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रांपैकी सुमारे 80 टक्के केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांवर जिल्हास्तरावरील कंट्रोल रूममधून सतत लक्ष ठेवले जाणार आहे.

परीक्षांदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समित्या, भरारी पथके आणि बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दहावी आणि बारावी परीक्षांसाठी प्रत्येकी सात भरारी पथके जिल्हा स्तरावर तर तालुकास्तरावरही स्वतंत्र पथके कार्यरत असतील. परीक्षा केंद्रांवरील बैठे पथकांमध्ये एक महिला प्रतिनिधी असणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे निगराणी केली जाणार असून परीक्षा केंद्रांच्या बाहेर व्हिडीओ चित्रीकरणही केले जाईल. तसेच परीक्षा काळात केंद्रांवर आणि परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, “दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घेतली आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”

या उपाययोजनांमुळे बीड जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles