मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण कार्यक्रम
• विविध योजनांच्या लाभाचे वाटप
• सेवा पंधरवडा शुभारंभ
• कुणबी प्रमाणपत्राचे वितरण
• सर्वांसाठी घरे – जमिनीचे पट्टे वाटप
• पोलीस विभागाच्या नवीन वाहनाचे लोकार्पण
बीड दि.17
जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबाचे स्वतःचे घर असले पाहिजे हे आपले ध्येय आहे. जिल्ह्यात विविध उपक्रम आणि प्रकल्पाच्या माध्यमातून बीडच्या विकास यात्रेची नवी सुरुवात झाली आहे. आपण सर्वजण मिळून जिल्ह्यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती-उद्योग-शिक्षण-आरोग्य-पर्यावरणासह सर्वच क्षेत्रात बीड जिल्ह्याला प्रगत जिल्ह्याच्या अग्रस्थानी आणणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी दिली.
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री विक्रम काळे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम हा मराठवाड्यातील जनतेचा लढा होता. अंबाजोगाई आणि बीड या लढ्याचा केंद्रबिंदू होता. हा लढा लोकांनी त्यांच्या गावा-गावात लढवला. या लढ्यात मराठवाड्यातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होते, त्यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. हा संघर्ष केवळ राजकीय नव्हता तर तो सामाजिक समतेचा, स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा लढा होता असे सांगितले.
जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले की, मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्ह्यातील युवकांना तंत्रज्ञान आधारित कौशल्य मिळावे म्हणून सिट्रीपलआयटी प्रकल्प उभारणीस गती देण्यात आली आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आणि एमआयडीसी यांच्या सहकार्याने 196 कोटी 98 लक्ष रुपयांचा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात साकारणार असल्याचे ते म्हणाले.
श्री. पवार पुढे म्हणाले, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीड-अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ होत आहे. दोन दिवसांपूर्वीच अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी 150 कोटी निधी वितरीत केला आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारीत 351 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. बीडच्या श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नवीन प्रशासकीय इमारत बीड येथे उभारण्यात येणार आहे. सहकार भवनाचीही इमारत उभारण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 550 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे श्री. पवार म्हणाले.
जिल्ह्यात पोलीस विभागाच्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून, गंभीर गुन्ह्यात घट झाली असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले की, जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी दर्जेदार वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे पालकमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.
मागणी दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले की, पुरामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील काही नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागले. या परिस्थितीवर माझे मंत्रालयातून बारकाईने लक्ष होते. जिल्ह्यातील या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेत होतो. पूरग्रस्तांना आणि बधितांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतपिकांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शासन शेतकरी आणि पशुपालकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री श्री. पवार यांनी ध्वजारोहण करुन, राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच यावेळी पथ संचलनाचे निरीक्षण केले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. पवार यांनी प्रियदर्शनी उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोक धून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
योजनांच्या लाभाचे वाटप व विविध क्षेत्रातील व्यक्तीचा सत्कार
यावेळी पालकमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या धीरज म्हस्के, महेश शेळके, सुनील वाकुरे आणि भागवत गायके यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. संजय मोरे, वसीम खान, मनीषा मस्के, कमलाक्षी देशमुख व अयोध्या बांगर यांना कायम शिक्षकांचे आदेश वाटप केले.
यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींचे बचाव कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे, सिरसाळाचे मंडळ अधिकारी उमेश कुदळे, नाथ्राचे ग्राम महसूल अधिकारी कृष्णा मुंडे, परळी तहसीलचे महसूल सहाय्यक वसीम शेख, रामेवाडीचे राजाभाऊ पौंळ,
बाबूराव रुपनर, खामगावचे रुपचंद लाकडे, छोटुराम लाकडे, मारुती लाकडे, रूपेश लाकडे, दत्तात्रय गव्हाणे, दिलीप राठोड यांचा, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा शुभारंभ करुन लाभार्थ्यांना लाभ वाटप
करण्यात आले. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र सतीष कदम, बाबुराव डोके, रघुनाथ कदम, व सतीष जाधव यांना वितरण करण्यात आले. सर्वांसाठी घरे या योजने अंतर्गत वाटप केलेल्या / अतिक्रमण नियमानुकल केलेल्या बप्पा ऊपळकर, अमजद पठाण, प्रकाश नरनाळे, बाबू मामडे, रियाज चाँद, गौतम साबळे, अशोक लोखंडे,
संभाजी वाघमारे, कमलाकर वाघमारे, अशुकेत वैरागे, हनुमान वाघमारे, दिपक वाघमारे, सुनिल वाघमारे, अमोल वाघमारे, गोविंद वाघमारे यांना जमीनीचे पट्टे वाटप करण्यात आले. पाणंद रस्ते सातबारावर नोंदी घेतलेले व सातबारा व फेरफार वाटप विष्णु दुसांगे, संदिप महारनोर, असराबाई खेडकर यांना करण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक कार्यालयास प्राप्त झालेल्या 45 वाहनांचे व नगर परिषद बीड यांनी खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.