बीड
बीड जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यावर सुमारे 66 आक्षेप आले आहेत. जिल्हा परिषदेसाठीच्या 60 तर पंचायत समित्यांसाठीच्या 6 आक्षेपांवर आता मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील गट गण रचनेचे भवितव्य ठरणार असल्याने सर्वांच्या नजरा आता आयुक्तालयाकडे आहेत.
बीड जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या 61 गट आणि 11 पंचायत समित्यांमधील 112 गणांसाठीची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली होती. त्याबर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. विशेषतः केज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 1 गट आणि पंचायत समितीचे 2 गण वाढलेले असल्याने या तालुक्यातून आक्षेपांची संख्या देखील जास्त आहे. जिल्हाभरातून एकूण 66 हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या असून त्यातील 32 एकट्या केज तालुक्यातील आहेत.
गावांची फेरबदल, भौगोलिक सलगतेकडे दुर्लक्ष, नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या नाहीत, गट किंवा गांवापासून गावाचे अंतर आदींच्या संदभनि बहुतांश हरकती घेण्यात आलेल्या आहेत. या सर्व हरकतींवर आयुक्तालयात विभागीय आयुक्तयालयांसमोर मंगळवारी (दि.5 ) सुनावणी होणार आहे. या सुनावणीला हरकत घेणाऱ्याला स्वतः किंवा वकिलांमार्फत म्हणणे मांडता येणार आहे. या हरकतींची सुनावणी होऊन त्यावर काय निर्णय होतो यावर गट गण रचनेचे भवितव्य ठरणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती हरकती ?
गेवराई-1 , माजलगाव-0, वडवणी-3. बीड-8, शिरूरकासार-6 , पाटोदा-0 , आष्टी-6 , केज-32 , धारूर-0 , परळी-3 , अंबाजोगाई-7