साहित्य सम्राट लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा अनु-जाती जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून अभिवादन रॅली व क्रांती मशाल रॅली काढून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
वास्तववादी साहित्य निर्माण करणारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या हयातीत 15 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, पटकथा, नाटके, पोवाडे यांच्या माध्यमातून साहित्याचा डोंगर उभा केला. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार होते. फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून म्हणाले की “जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव” या महीप्रमाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानीत होते. फकीरा कादंबरीला 1961 साली राज्य सरकारकडून उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता.
आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लिखाणात संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण बेळगाव हे कर्नाटकमध्ये विलीन करण्यात आले. तेव्हा अण्णाभाऊंनी कवन रचून महाराष्ट्र प्रेम व्यक्त केले. “माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली” साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला जगासमोर मांडून त्यांना आपल्या साहित्यातून न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण केलेले साहित्य आजच्या युवक पिढीने आत्मसात करून इतरांना वाचण्यासाठी प्रवृत्त केले तरच आण्णाभाऊ साठे यांना खरे अभिवादन ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.