बीड, दि.17
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान म्हणजे केवळ स्पर्धा नसून ग्रामीण भागाच्या परिवर्तनाची दिशा आहे. गावातील प्रत्येकाने या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतल्यासच आपल्या गावचा शाश्वत विकास होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
काकडहिरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार सर्वश्री विक्रम काळे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, डॉ. योगेश क्षीरसागर,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख,जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, गावच्या सरपंच प्रीती बागलाने, ह.भ.प.शिवाजी महाराज आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ग्रामविकासाठी शासनाने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
राज्याच्या सर्वच जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ करण्यात येत आहे. पुरस्काररूपाने या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी २४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तालुका, जिल्हा , विभाग तसेच राज्यस्तरावरून याचे मूल्यमापन करण्यात येणार असून या अभियानांतर्गत १ हजार ९०० हुन अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यातून ग्रामपंचतीना विकासासाठी मोठा निधी प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले.
गावागावात सुशासन प्रस्थापित करून ग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मितीसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात अतिशय निकोप स्पर्धा ठेवण्यात आली आहे. देशाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी गावचे प्रश्न सोडवून गावांचा शाश्वत विकास साधण्याची गरज आहे.
शाश्वत विकासातून सद्याच्या पिढीच्या गरजा भागवतानाच पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे संवर्धन सर्वांनी करण्याची गरज आहे. त्यामूळे गावाच्या शाश्वत विकासाला शासन प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, योजनांचे अभिसरण, संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय आणि लोकसहभाग व श्रमदान हे या अभियानाचे सात प्रमुख घटक आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाने ‘आमचे गाव, आमचा विकास’ या भावनेतून पुढाकार घेण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन आपल्या सर्वांच्या सहकार्याने निर्माण करायचे असून स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होऊ शकत नाही. या अभियानामुळे ग्रामपंचायतींना लोकसहभागातून गावचे नियोजन आणि सर्वांगिण विकास करण्याची संधी मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तत्कालीन गृहमंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून श्रमदान, लोकवर्गणी,लोकसहभागातून गावे स्वच्छ, सुंदर केली. वृक्षारोपणातुन पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम कशा पद्धतीने केले जाते हे दाखवून दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आपली भूमी साधू संतांची आहे. त्यांचे आचार-विचार आपल्या प्रत्येकाचे मनात रुजले आहेत. शिव-शाहू-फुले आंबेडकरांच्या विचाराने आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. जातीय सलोखा निर्माण करत एकोप्याने राहून आपल्याला विकास साधायचा असल्याचेही ते म्हणाले.
संपूर्ण जगात आपला भारत देश अग्रेसर ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या देशात आपले राज्य अग्रेसर राहावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यात आपला बीड जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी जिल्हा वासीयांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बीड जिल्हा वासीयांचे रेल्वेचे स्वप्न आज पूर्ण होत असून या रेल्वेच्या प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी विद्युत व्यवस्थेवर रेल्वे चालवण्याची व्यवस्था करण्याबरोबर ही रेल्वे पुणे व मुंबई पर्यंत नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रीती बागलाने यांनी केले.
फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी उपस्थितांना एल.ई.डी. च्या माध्यमातून दाखविण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेंतर्गत कार्डचे वितरण, मराठा आरक्षणातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लक्ष रुपयांच्या आर्थिक मदतीच्या धनादेशाचे तसेच विविध स्वयं सहायता गटांना कर्जाच्या धनादेशाचे प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म योजनेअंतर्गत धनादेशाचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.