बीड, दि.21
pankaja munde beed visit जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टीने झालेल्या शेती तसेच मालमत्ता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन बाधीत शेतकरी आणि नागरिकांना तातडीने मदत करणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीत श्रीमती पंकजा मुंडे बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार चंद्रकांत शेळके तसेच संबंधित कार्यालय प्रमुख यांच्यासह सर्व तहसीलदार दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतपिकाचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले असून, शेतकरी व नागरिकांवर ओढवलेली ही संकटाची वेळ आहे. या संकटाच्या वेळी राज्य शासन त्यांच्या सोबत असुन, शक्य तेवढ्या लवकर नुकसानग्रस्तांना मदत करणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र जनावरांचे नुकसान, सतेच मालमत्तेचे नुकसान या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेवून मदत कार्यात कोणताही अडथळा येवू न देता शासनाकडून शक्य तेवढी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच अतिवृष्टीने वाहून गेलेली जनावरे यांची कागदपत्रे पुरावा नसला, तरी त्याची शहानिशा करून, संबंधीतांना नुकसानीची मदत मिळेल यासाइी प्रयत्न करणार आहे.
शेतकऱ्यावर ओढवलेली ही संकटाची वेळ असुन, त्यामुळे कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. शेतकरी व सामान्य नागरिकांवर आलेल्या संकटाची तीव्रता लक्षात घेवून तातडीने पंचनामे करून मदत पोहोचविण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.
जिथे गाळ साचला असेल, पूल वाहून गेला असेल किंवा पाणंद रस्ते, धोकादायक इमारती, ग्रामीण रस्ते यांच्या पुनर्वसनासाठी संबंधितांनी पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा. हा अहवाल मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करुन, यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या.
जिल्हाधिकारी व त्यांच्या टीमने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तसेच संकटाचा सामना करून, अतिवृष्टीतील परिस्थिती आटोक्यात आणली. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत पोहचविली त्याबद्दल जिल्हाधिकारी व त्यांच्या टीमचे श्रीमती मुंडे यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सादरीकरणांद्वारे अतिवृष्टीत प्रभावित झालेल्या गावांची संख्या, बाधित शेतपिकांचे क्षेत्रफळ, पूर्णपणे व अंशतः नुकसानग्रस्त घरे, रस्ते, विद्यूत पोल यांचे झालेले नुकसान, जलस्रोत व पायाभूत सुविधावर झालेला परिणाम, घरे पूर्णपणे कोसळल्याने बाधित कुटूंबांसाठी तात्पुरती केलेली निवासाची सोय तसेच पुरात वाहून गेलेल्या नागरिकांची तसेच जनावरांची सविस्तर माहिती सादर केली.