परळी / प्रतिनिधी
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या विदारक परिस्थितीत डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) युवक संघटनेच्या परळी तालुका कमिटीच्या वतीने सिरसाळा चौकामध्ये राज्य शासनाच्या धोरणांविरोधात मंगळवार दि 14 रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकरी आणि विद्यार्थी या दोघांनाही बसला असून, शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मागील महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, विशेषतः मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. शेतीमधील पीक आणि माती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले सगळे पीक निसटून गेले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफी करण्याची मागणी DYFI ने केली आहे. या संकटाचा मोठा फटका विद्यार्थ्यांनाही व युवकांनाही बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षण शुल्क, निवास आणि भोजन खर्च भागविणे अडचणीचे झाले आहे.
विद्यार्थ्यांवरील हा शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी अतिवृष्टी झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अतिवृष्टीत पडझड झालेल्या शाळांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, युवकांच्या रोजगारासाठी सर्व रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करावी आणि कंत्राटी पद्धती बंद करावी, एमपीएससी सह इतर सर्व स्पर्धा परीक्षांची फी माफ करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
या मागण्या घेऊन करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये DYFI युवक संघटनेचे बीड जिल्हा सचिव विशाल देशमुख, तसेच विजय घुगे, सिद्राम सोळंके, मनोज देशमुख, मुंजाभाऊ नवघरे, इस्माईल शेख, मदन राठोड, अशोक जाधव, मदन वाघमारे, बिबीशन भिसे, प्रकाश कावळे, महादेव शेरकर, प्रवीण देशमुख ,यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. शासनाने या मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी DYFI च्या वतीने देण्यात आला.