बीड, दि. 16 मार्च :
बीड गुटखा जप्त प्रकरण: जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत फुलाईनगर परिसरातून सुमारे 6 लाख 68 हजार 184 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि स्विफ्ट कार जप्त केली आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बीड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील फुलाईनगर परिसरातून स्विफ्ट कार (MH-43/R-5725) मधून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 16 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजता फुलाईनगर येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान स्विफ्ट कारमध्ये भाऊसाहेब राम पडुळे (वय 34, रा. औरंगपुर, ता. जि. बीड) हा इसम आढळून आला. तपासादरम्यान त्याच्याकडून विविध कंपन्यांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी कार आणि गुटखा असा एकूण 6,68,184 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपीने हा गुटखा रेवन्नाथ चादर (रा. भाटसांगवी, ता. जि. बीड) याच्याकडून आणल्याची माहिती दिली असून तो सध्या फरार आहे.
या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि श्रीराम खटावकर, पोह राहुल शिंदे, पोह युनुस बागवान, मपोह स्वाती मुंडे, पोअं अशपाक सय्यद, पोअं मनोज परजणे आणि चालक पोह नितीन वडमारे यांचा समावेश होता.
