बीड
जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे अखेर निलंबित, विभागीय आयुक्त यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
बीडच्या परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यानंतर त्यांना अटक झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर न्यायालयाने मुंडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना बीड जिल्हा कारागृहात हलविण्यात आले आहे.
नियमांनुसार एखादा लोकसेवक ४८ तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन अभिरक्षेत राहिल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी अटकेच्या दिवसापासून म्हणजेच २० फेब्रुवारीपासून व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या कारवाईमुळे परळीतील महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.
